Home Cities जळगाव  भवानी मंदिरात ५१ फूट कळसपूजन सोहळा उत्साहात

 भवानी मंदिरात ५१ फूट कळसपूजन सोहळा उत्साहात


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  श्रावण महिन्याच्या पावन सोमवारनिमित्त, जळगाव शहरातील ऐतिहासिक भवानी माता मंदिरात आज ५१ फूट उंच कळस पूजनाचा भव्य व भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या धार्मिक विधीचे औचित्य आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते पार पडले असून, मंदिराच्या जिर्णोद्धार प्रक्रियेतील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

सराफ बाजार परिसरात वसलेले भवानी माता मंदिर हे जळगावकरांच्या श्रद्धेचे केंद्र असून, अनेक पिढ्यांपासून इथं भक्तांचा ओघ कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या जिर्णोद्धाराची गरज भासत होती. अखेर, या कामाचा शुभारंभ करताना आज कळस पूजनाने या आध्यात्मिक कार्याला वेग मिळाला. विधीवत पूजा पुजारी पुना महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पूजनस्थळी आमदार भोळे यांच्यासह श्रीकांत खाटोड, राजू बांगर यांसारखे मान्यवर उपस्थित होते. स्थानिक व्यापारी, भक्तगण आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त भवानी माता मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागली होती. पूजनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अनेकांनी मोठ्या भक्तिभावाने भवानी मातेला अभिषेक, फुले व फळांची अर्पणा केली व मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी सांगितले की, भवानी माता हे जळगाव शहराचे आध्यात्मिक वैभव असून, मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांच्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. “या परिसरात अध्यात्मिक पर्यटनास चालना मिळावी आणि येथील श्रद्धास्थान अधिक भव्य होऊन भाविकांना योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

या भव्य पूजन सोहळ्यामुळे सराफ बाजार परिसरात सणासारखा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशा आणि भजनांच्या गजरात मंदिराचा परिसर गगनभेदी झालेला होता. नव्या कळसामुळे मंदिराचे रूप अधिक तेजस्वी झाले असून, यामुळे भाविकांची श्रद्धा अधिक दृढ होईल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound