Home पर्यावरण वाघ वाचवा जनजागृती मोटारसायकल रॅलीचे आयोजन

वाघ वाचवा जनजागृती मोटारसायकल रॅलीचे आयोजन


जळगाव– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जगभर साजऱ्या होणाऱ्या जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण संस्था व यावल वनविभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “वाघ वाचवा, जंगल वाचवा” हा संदेश देणारी भव्य मोटारसायकल जनजागृती रॅली 28 जुलै रोजी जळगाव ते पाल मार्गे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या 100 व्याघ्रदूतांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

या रॅलीचे उद्घाटन 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता यावल वनविभाग कार्यालय, काव्यरत्नावली चौक येथून आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, श्री. भरतदादा अमळकर, श्री. राजेंद्र नन्नावरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रॅलीच्या आयोजनामध्ये यावल उपवनसंरक्षक जमीर शेख यांचे मार्गदर्शन लाभत असून, संपूर्ण कार्यक्रमाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी दिली.

विशेष म्हणजे या रॅलीत यंदा प्रथमच विवेकानंद प्रतिष्ठानच्या 25 शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असून, रॅलीत सहभागी व्याघ्रदूतांना जंगल सफारीचा अनुभव देण्यात येणार आहे. तसेच वनस्पती, पक्षी अभ्यासक व वन्यजीव संशोधक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जनजागृतीचा भाग म्हणून रॅलीदरम्यान ठिकठिकाणी “वाघ वाचवा, जंगल वाचवा” आणि “वाघांचे अस्तित्व, निसर्गाचे संतुलन” अशा घोषणांसह पथनाट्य सादर केले जाणार आहे. रॅली जळगाव, नशिराबाद, भुसावळ, सावदा, फैजपूर मार्गे पाल येथे पोहोचणार आहे.

29 जुलै रोजी यावल येथे जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या हस्ते होणार असून, यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तसेच वनमजूरांना चटई आणि विद्यार्थ्यांना टी-शर्टचे वाटप होणार आहे. त्यानंतर वृक्षारोपण, बीजारोपण व इतर जनजागृती उपक्रम राबवले जातील, अशी माहिती सचिव योगेश गालफाडे यांनी दिली.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, संस्थापक बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, राजेश सोनवणे, राहुल सोनवणे, प्रदीप शेळके, अजीम काझी, ऋषीं राजपूत, वासुदेव वाढे आदींनी मेहनत घेतली आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातील कोब्रा अ‍ॅडव्हेंचर, रायबा ट्रेकर्स ग्रुप, ठाण्यातील जीहोवोहम चॅरिटेबल ट्रस्ट, गुजरातमधील WCB फाउंडेशन यांसह महाराष्ट्र व गुजरातमधील अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

या भव्य रॅलीच्या माध्यमातून वाघांच्या संवर्धनाविषयी जनतेत जागरुकता निर्माण होणार असून, जंगलांचे रक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर सर्व नागरिकांची जबाबदारी आहे, हे अधोरेखित होणार आहे.


Protected Content

Play sound