यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका आणि जळगाव शहर यांना थेट जोडणाऱ्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाच्या नागरी वाहतूक पुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असून, या प्रकल्पाच्या दिरंगाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या कामाला तातडीने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी केली आहे.
शेळगाव बॅरेज हा यावल तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असा मध्यम प्रकल्प असून त्याद्वारे संपूर्ण तालुक्याला जलसिंचन व दळणवळणाच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. या बॅरेजवर तयार होणारा नागरी वाहतूक पूल यावल शहराला जळगाव जिल्ह्याच्या प्रमुख बाजारपेठेशी थेट जोडणारा दुवा ठरणार आहे. मात्र, या पुलाच्या कामाला निधीअभावी गेल्या तीन वर्षांपासून खंड बसलेला आहे. बॅरेजचे मुख्य काम जवळपास पूर्णत्वाच्या टप्प्यावर असताना देखील पूल बांधकामाच्या दिरंगाईमुळे संपूर्ण प्रकल्पाचा उपयोग पूर्णपणे नागरिकांना मिळत नाही, ही खेदजनक बाब असल्याचे सोनार यांनी नमूद केले.

पूल बांधकामासाठी निधी न मिळाल्याने शासनाची ढिसाळ कारभारशैली समोर आली आहे, असे सांगून नितीन सोनार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामास वेग देण्यासाठी आणि आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून मागणी करणार असल्याचे सांगितले. त्यांनी या मागणीसाठी लवकरच अधिकृत पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचेही स्पष्ट केले.
यावल तालुक्याच्या आर्थिक, सामाजिक आणि वाहतूकविषयक विकासात शेळगाव बॅरेजमधील पूल हा महत्त्वपूर्ण ठरणार असून त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी ठामपणे मांडली. या पुलाच्या माध्यमातून तालुक्याच्या शेती, व्यापार आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासालाही मोठा हातभार लागणार आहे, असे मत नितीन सोनार यांनी व्यक्त केले.



