
यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चूल आणि मूलच्या चौकटीपलीकडे जाऊन मुलींनी आजच्या काळात आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी आणि स्वबळावर उभे राहून समाजात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केले. यावल येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होत असलेल्या ‘जनविश्वास सप्ताहा’ अंतर्गत ‘सजग युवती, सक्षम युवती’ या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात थोर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवती जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे, तालुका अध्यक्ष रितेश पाटील, तालुका उपाध्यक्ष राजेश करांडे, महिला शहराध्यक्ष योगिता घोडके, विद्यार्थी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, कामराज घारु, जुगल पाटील, आकाश चोपडे, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, तसेच जळगाव येथून आलेले व्याख्याते हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उभा करताना माँ जिजाऊंच्या योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न केले ते आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजेत. स्वबळावर उभं राहणं ही काळाची गरज असून त्यासाठी जिद्द आणि परिश्रम आवश्यक आहेत.
पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सोशल मिडिया वापरताना महिलांनी आणि युवतींनी घ्यावयाची काळजी यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी अनेक प्रात्यक्षिके देत सुरक्षा कशी राखावी याचे टिप्स दिले. त्यानंतर व्याख्याते हर्षल पाटील यांनी ‘आजच्या युगाची तुच जिजाऊ, तुच सावित्री उद्योगिनी’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करत आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, मुलींनी आता स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सजग व ठाम होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात ‘एक झाड माझ्या दादांचं…!’ या उपक्रमांतर्गत साने गुरुजी विद्यालयातील दहा विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सामाजिक भान जागवले गेले.
कार्यक्रमाने मुलींमध्ये आत्मविश्वासाचे बीज रोवले असून, त्यांना भविष्यात समाजातील अनेक अडथळ्यांना सामोरे जात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग मिळतो आहे, हे निश्चित.



