Home Cities जळगाव मंत्री गुलाबराव पाटील राजीनामा द्या !; ठाकरे गटाची मागणी

मंत्री गुलाबराव पाटील राजीनामा द्या !; ठाकरे गटाची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील अभियंता हर्षल पाटील या कंत्राटदाराने जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांचे १ कोटी ४० लाख रुपये थकल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शासनाकडून बिले मिळत नसल्यानेच तणावातून ही आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवूनही संबंधित मंत्री जागे झाले नाहीत, त्यामुळे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते गुलाबराव वाघ यांनी केली आहे. शुक्रवारी, २५ जुलै रोजी दुपारी १ वाजता शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.

यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष शरद तायडे आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गुलाबराव वाघ यांनी आरोप करताना म्हटले की, “विधानसभेत मंत्र्यांना रमी खेळायला आणि गुंडगिरी करायला वेळ आहे, पण शेतकरी आणि ठेकेदार यांच्याकडे पाहायला वेळ नाही. यामुळेच शेतकरी आणि ठेकेदार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.” महाराष्ट्रात जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले थकवली आहेत आणि ती अजूनही मिळालेली नाहीत, असेही ते म्हणाले.

पाणीपुरवठ्याच्या कोणत्याही योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा ठपका ठेवत, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेत करण्यात आली.


Protected Content

Play sound