Home मनोरंजन अश्लीलतेवर सरकारचा दणका! ‘उल्लू’सह २५ मोबाईल ॲप्सवर बंदी

अश्लीलतेवर सरकारचा दणका! ‘उल्लू’सह २५ मोबाईल ॲप्सवर बंदी


नवी दिल्ली -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा।   भारतीय समाजावर परिणाम करणाऱ्या अश्लील आणि आक्षेपार्ह डिजिटल कंटेंटविरोधात केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) एकूण २५ मोबाईल ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या ॲप्सवर अश्लील सामग्री प्रसारित केल्याचा आणि आयटी कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या यादीत ‘उल्लू’ आणि ‘अल्ट बालाजी’ यांसारख्या चर्चित ॲप्सचाही समावेश आहे.

या कारवाईपूर्वी मार्च महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने अशाच स्वरूपाच्या १९ वेबसाइट्स, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल्सवर बंदी घातली होती. मात्र, ताज्या कारवाईमध्ये मोबाईल ॲप्सवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की या ॲप्सवर कोणतीही सेन्सॉरशिप नव्हती आणि त्या माध्यमातून सतत अनुचित, अश्लील आणि समाजाच्या नैतिकतेला धक्का देणारी सामग्री प्रसारित केली जात होती.

सरकारने ही कारवाई आयटी कायदा २००० आणि इतर सायबर कायद्यांच्या आधारे केली आहे. या ॲप्समधून लहान मुलं, किशोरवयीन आणि तरुण यांना टार्गेट करण्यात येत होतं. कोणतीही वय पडताळणी न करता थेट अश्लील सामग्री उपलब्ध करून दिली जात होती. यामुळे समाजातील मानसिक, नैतिक आणि सांस्कृतिक अध:पतन वाढण्याची शक्यता असल्याचे सरकारचं म्हणणं आहे.

बंद करण्यात आलेल्या २५ ॲप्समध्ये ALTT, ULLU, Big Shots App, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalva App, Wow Entertainment, Look Entertainment, Hit Prime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchal App, MoodX, NeonX VIP, ShowHit, Fugi, Mojflix आणि Triflicks यांचा समावेश आहे.

या ॲप्सवर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये मुख्यत्वे अश्लील व्हिडिओ आणि वेब सिरीज प्रसारित करणे, वयोगट न तपासता कंटेंट उपलब्ध करणे, वापरकर्त्यांच्या डेटाची गोपनीयता धोक्यात घालणे, आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणे यांचा समावेश आहे.

सरकारच्या मते, ही कारवाई समाजहितासाठी गरजेची होती. अनेक अशा प्रकारच्या डिजिटल कंटेंटमुळे तरुणांमध्ये चुकीचे आदर्श तयार होत होते आणि सोशल मीडियावरही असे व्हिडिओ व्हायरल होत होते. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरील स्वच्छता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी ही बंदी टाकण्यात आली आहे.

ही ॲप्स लवकरच Google Play Store आणि Apple App Store वरून हटवण्यात येणार आहेत. सरकारने इशारा दिला आहे की, अशा प्रकारचा कंटेंट प्रसारित करणाऱ्या इतर प्लॅटफॉर्म्सवरही कारवाई केली जाईल. डिजिटल स्पेसमधील शिस्त आणि नैतिकता टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं अधिकृत सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


Protected Content

Play sound