जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने जळगावमधील विठ्ठल पेठ भागातील न्यू बाल मित्र मंडळ “राजा बदाम गल्लीचा” येत्या ३१ जुलै रोजी आपल्या लाडक्या २४ फुटी गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी मुंबईकडे रवाना होत आहे. मंडळाचे कार्यकर्ते आणि जुने जळगाव परिसरातील मित्र मंडळींच्या मोठ्या उत्साहात हा प्रवास सुरू होणार आहे.
या प्रवासात मंडळाचे सदस्य तेजस काळे, भैरव खडके, आकाश झोपे, रोहन झोपे, बंटी खडके, चंद्रकांत पाटील, पियुष काळे, गुंजन काळे, रोहित नेमाडे, लोकेश खडके, कपिल खडके, उमेश माळी, प्रशांत पाटील, उदय खर्चे, आलोक काळे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या विशेष उपक्रमासाठी जुने जळगाव भागातील इतर मंडळांचेही सहकार्य लाभले आहे.

२ ऑगस्ट रोजी मुंबईतील बोरिवली येथील सिद्धिविनायक आर्टचे मूर्तिकार किरण जाधव यांच्या कार्यशाळेतून गणपती बाप्पाचे आगमन काढण्यात येणार आहे. ही भव्य मूर्ती जळगावला ६० तासांच्या आत पोहोचण्याची शक्यता आहे.
जळगाव ते मुंबई आणि परत जळगाव असा एकूण ९०० किलोमीटरचा प्रवास ट्रॅक्टर-ट्रॉलीने होणार आहे. हा प्रवास भिवंडी, कसारा घाट, इगतपुरी, नाशिक, धुळे मार्गे होईल. एकूण ५ दिवसांचा हा प्रवास असून, यामध्ये ३ रात्री मुक्काम असणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी जुन्या जळगावात उत्सुकतेचे वातावरण असून, मंडळाने जय्यत तयारी केली आहे.



