
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील केळी आणि ट्रान्सपोर्ट उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी एटीएम सेवा बंद राहत असल्याने नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात अनेक राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या शाखा असूनही सुटीच्या दिवशी पैशांची निकड असताना एटीएम बंद असल्याने नागरिकांना निराश होऊन इतरत्र धावपळ करावी लागत आहे. अनेकदा यामुळे अत्यावश्यक गरजांमध्येही अडथळे येत असल्याचे प्रकार घडले आहेत.

सावदा हे आर्थिक उलाढालीचे केंद्र असल्याने येथील नागरिक आणि व्यावसायिकांना नेहमीच पैशांची गरज असते. मात्र, बँकांकडून सुटीच्या दिवशी एटीएम बंद ठेवले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी बँक व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त करत, सुटीच्या दिवशीही एटीएम सेवा सुरू ठेवणे ही बँकांची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून बँक व्यवस्थापनांना सक्त सूचना द्याव्यात आणि सावदा परिसरातील नागरिकांना अखंडित एटीएम सेवा मिळावी यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी सावदा परिसरातील जनतेकडून केली जात आहे.



