Home प्रशासन तहसील रावेर तहसील कार्यालयात मतदान यंत्रांची तपासणी !

रावेर तहसील कार्यालयात मतदान यंत्रांची तपासणी !


रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावेर येथील तहसील कार्यालयात आज सुमारे साडेचारशे मतदान यंत्रांची (EVM) सखोल तपासणी करण्यात आली. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ही पूर्वतयारी सुरू आहे.

तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती भागात मतदान यंत्रे तपासणीसाठी विशेष १६ टेबले लावण्यात आली होती. या प्रत्येक टेबलावर चार कर्मचारी याप्रमाणे एकूण ६४ तलाठी आणि मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी २२८ बॅलेट युनिट आणि २२३ कंट्रोल युनिट अशा एकूण ४५१ मतदान यंत्रांची कसून तपासणी केली.

तपासणीदरम्यान, सर्व यंत्रे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करण्यात आली. जी यंत्रे नादुरुस्त आढळली, ती दुरुस्तीसाठी स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहेत. ही नादुरुस्त यंत्रे लवकरच दुरुस्त केली जातील, जेणेकरून निवडणुकीसाठी पुरेसे कार्यान्वित मतदान यंत्रे उपलब्ध असतील.

सदर तपासणी तहसीलदार बी.ए. कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, निवडणूक शाखा नायब तहसीलदार किशोर पवार, महसूल नायब तहसीलदार आर.डी. पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या तपासणीमुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांबाबत कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही याची सुनिश्चिती करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound