जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील बाबा नमकीन कंपनीसमोर हातात लोखंडी तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी २१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील बाबा नमकीन कंपनीसमोर राज सुरेश तायडे (वय १९, रा. पोलीस कॉलनी, जळगाव) हा तरुण बेकायदेशीरपणे हातात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी तात्काळ आपल्या पथकाला कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार, पथकाने सोमवारी २१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सापळा रचून संशयित आरोपी राज तायडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल मंदार महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राज तायडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे हे करत आहेत.




