जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, अनुशोधन राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (ANRF) अंतर्गत “अ मल्टीयुनिर्व्हसिटी अलायन्स ऑन हेल्थ अँड एनर्जी थ्रू इंजिनिअर्ड बायोमोलक्युलर सिस्टीम्स” या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. देशातील उच्च दर्जाच्या सहा विद्यापीठांचा समावेश असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात जळगावच्या विद्यापीठाचा सहभाग हा मानाची बाब मानली जात आहे.
हा प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER), पुणे येथील डॉ. होमी भाभा रोडवरील मुख्य संशोधन प्रा. होथा श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली कार्यान्वित होणार असून, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील एकत्रित प्रयत्नांमुळे विद्यापीठ राष्ट्रीय राज्यविद्यापीठ रॅंकिंगमध्ये टॉप १०० मध्ये पोहोचले आहे. याचमुळे विद्यापीठ या प्रकल्पासाठी पात्र ठरले.

PAIR (Participating Alliance for Innovation and Research) या योजनेअंतर्गत वर्ग ब विद्यापीठांमध्ये समावेश होणाऱ्या या प्रकल्पासाठी एक वर्षासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, हा निधी “ग्रांट-इन-एड जनरल” (Recurring head) अंतर्गत आहे. या प्रकल्पामध्ये भारतातील विविध भागांतील सहा विद्यापीठांचा समावेश आहे. इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अवंतीपोरा येथील डॉ. आबिद हुसेन शाल्ला, मणिपूर युनिव्हर्सिटी, इंफाळचे डॉ. राजू लैशराम, मोहनलाल सुखाडिया युनिव्हर्सिटी, उदयपूरचे डॉ. सिद्धार्थ शर्मा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा. दिपक शरद दलाल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. राजू गच्चे, तसेच काश्मीर युनिव्हर्सिटी, श्रीनगरचे प्रा. अजीज ए. दार यांचा या प्रकल्पात सक्रीय सहभाग असणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून संशोधनासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा, सहयोगी उपक्रम, तसेच प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक देवाणघेवाणीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. प्रकल्पाच्या नियोजनामध्ये चार कार्यशाळांचे आयोजन, तसेच काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांना IISER, पुणे येथे संशोधनासाठी प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधन व नावीन्यपूर्ण उपक्रमांना भक्कम आधार मिळणार आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक प्रगतीसाठी ही एक ऐतिहासिक संधी असून, राष्ट्रीय स्तरावरील सहकार्य, संसाधनांची देवाणघेवाण आणि नवसंशोधनासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.



