Home राजकीय उज्ज्वल निकम यांची मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वाढली?

उज्ज्वल निकम यांची मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वाढली?


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  देशातील उच्चस्तरीय दहशतवादविरोधी खटल्यांमध्ये ठाम भूमिका घेणारे आणि आपल्या परखड युक्तिवादांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नुकतीच राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा रंगत असतानाच भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

उज्ज्वल निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला, केरळ भाजपचे नेते सी. सदानंदन मास्टर आणि इतिहास अभ्यासक डॉ. मीनाक्षी जैन यांची नुकतीच राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले की, उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेवर नियुक्त होणे ही सन्मानाची बाब आहे. लोकसभेला अल्प मतांनी पराभव झाल्यानंतरही पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे, हे महत्त्वाचे आहे. ते एक अत्यंत अनुभवी आणि देशहितासाठी काम करणारे विधिज्ञ आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून सरकारकडून पुढे काही मोठी जबाबदारी देण्यात येऊ शकते.

महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले की, उज्ज्वल निकम यांची केवळ खासदारकीसाठी नियुक्ती झालेली नसून त्यांचा अनुभव आणि कार्यकौशल्य लक्षात घेता त्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी अनेक दहशतवादविरोधी आणि देशविरोधी कारवायांवरील खटल्यांमध्ये यशस्वीपणे बाजू मांडली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला अशा प्रकारच्या कठीण विषयांवर मार्गदर्शन करणारा जाणकार चेहरा मिळणे, ही सरकारसाठीही फायदेशीर गोष्ट ठरेल.

मात्र, उज्जल निकम यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास जळगाव जिल्ह्यातून दोन केंद्रीय मंत्री होण्याची शक्यता निर्माण होईल. यामुळे सध्या केंद्रीय मंत्रिपद भूषवणाऱ्या रक्षा खडसे यांच्या स्थानाला धोका निर्माण होऊ शकतो का, असा सवाल महाजन यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना महाजन यांनी सांगितले की, अशा परिस्थितीतही धोका असल्याचे त्यांना वाटत नाही. अनेक राज्यांतून तीन ते चार मंत्री असतात. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा असतो. कोणाला मंत्री करायचे, कोणाला नाही, हे ठरविण्याचे अधिकार पक्षाकडे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मतभेद निर्माण होण्याची शक्यता नाही.

संपूर्ण घडामोडीकडे पाहता, उज्ज्वल निकम यांच्या नावावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा देशपातळीवर घेण्याचा विचार असल्यास, मंत्रिमंडळात त्यांचे आगमन निश्चितच मोठे पाऊल ठरेल.


Protected Content

Play sound