Home क्राईम केळीबागेत नवजात बाळ आढळल्याने परिसरात खळबळ 

केळीबागेत नवजात बाळ आढळल्याने परिसरात खळबळ 



सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सावदा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिनावल-उतखेडा रस्त्यावरील वडगाव शिवारात तुषार भास्कर पाटील यांच्या केळीच्या बागेत अवघ्या एक दिवसाचे एक जिवंत बाळ आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने मानवतेला काळिमा फासला गेला असून, परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे केळी कापणीसाठी काही कामगार तुषार पाटील यांच्या बागेत गेले होते. त्यावेळी त्यांना या नवजात बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. कामगारांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता, त्यांना हे बाळ केळीच्या झाडांमध्ये पडलेले दिसले. हे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ ही माहिती वडगावचे पोलीस पाटील संजय वाघोदे आणि चिनावलचे पोलीस पाटील निलेश नेमाडे यांना दिली. दोन्ही पोलीस पाटलांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तात्काळ निंभोरा पोलीस स्टेशनला याबाबत कळवले.

माहिती मिळताच, निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि चिनावल येथील डॉ. जयंत पाटील यांच्या देखरेखीखाली बाळाची पाहणी केली. बाळाला तातडीने उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच, त्याला कसलाही विलंब न करता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या घटनेची नोंद निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या नवजात बाळाला निर्दयीपणे सोडून देणाऱ्या जन्मदात्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक चौकशीच्या आधारे पोलीस तपास वेगाने करत आहेत. या घटनेमुळे समाजात एक संवेदनशील प्रश्न निर्माण झाला असून, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound