जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशासाठी सेवाकार्य करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि गुणवंत पाल्यांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या वतीने “विशेष गौरव पुरस्कार” देण्यात येणार असून, यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पात्र नागरिकांना या सन्मानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष पुरस्कारामागील उद्देश म्हणजे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करणे. शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य, तसेच अन्य क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांच्या पत्नी तसेच पाल्य यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार असून, त्यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अर्ज करणाऱ्या पाल्यांनी इ. १० वी मध्ये ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण, तर इ. १२ वी मध्ये ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेले असावेत. तसेच माजी सैनिक, त्यांच्या पत्नी अथवा पाल्यांनी देश, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाभिमुख किंवा गौरवास्पद कार्य केलेले असावे. अशा व्यक्तींनी दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत.



