Home प्रशासन तहसील “शासन आपल्या दारी” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद 

“शासन आपल्या दारी” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद 


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “शासन आपल्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून शासनाने नागरिकांपर्यंत थेट सेवा पोहोचवण्याचा संकल्प केला असून, आदिवासी बांधवांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा योग्य रीतीने लाभ घ्यावा, असे आवाहन रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी केले. ते मोहमांडली (ता. रावेर) येथील माध्यमिक आश्रमशाळेत आयोजित शिबिरात बोलत होते. हे शिबिर ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान’ अंतर्गत घेण्यात आले.

या अभियानाचा उद्देश म्हणजे एकाच ठिकाणी विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ देणे. याच उपक्रमाअंतर्गत मोहमांडली येथे १२३९ योजनांची माहिती व लाभ एकत्रितपणे देण्यात आले. शिबिराची सुरुवात आदिवासी शूरवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचे नमूद केले.

शिबिरात वनपाल राठौड (रावेर), पुरवठा अधिकारी शिरेकर, सहायक कृषी अधिकारी देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, मंडळ अधिकारी निलेश धांडे, तलाठी, ग्रामसेवक शिरीन तडवी, गावाचे पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तसेच स्थानिक नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिबिरात शासकीय कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये 200 जात प्रमाणपत्रे, 220 डोमिसाईल प्रमाणपत्रे, 220 नॅशनल सर्टिफिकेट्स, तसेच 20 आयुष्मान भारत कार्ड्स वाटप करण्यात आले. याशिवाय मतदान ओळखपत्रे, रेशनकार्डे आणि जन्म प्रमाणपत्रे देखील अनेक लाभार्थ्यांना मिळाली. आरोग्य तपासणीसाठी 25 बालकांसह ग्रामस्थांनीही सहभाग नोंदवला. प्रलंबित रेशनकार्ड प्रकरणे आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या प्रलंबित प्रकरणांचीही नोंद घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी शिबिरात येणाऱ्या लाभार्थ्यांना योजनांची सविस्तर माहिती दिली आणि त्यांना अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.


Protected Content

Play sound