जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कुशीनगर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना एका २४ वर्षीय महिलेचा अचानक संपर्क तुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव रेल्वे स्थानकानंतर तिचा कुठलाही ठावठिकाणा लागत नसल्यामुळे तिच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
सौ. शितल उमेश बाविस्कर, वय २४, रा. विठ्ठल मंदिराजवळ, वार्ड नं. ०९, दर्यापूर, जि. बुरहानपूर (मध्यप्रदेश) या तरुणीने दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ट्रेन क्रमांक २२५३८ कुशीनगर एक्स्प्रेसच्या एस/२ या आरक्षित डब्यातून जळगाव ते नेपानगर असा प्रवास सुरू केला होता. मात्र, जळगाव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर तिचा अचानक संपर्क तुटला आणि ती तिच्या गंतव्य स्थळी – रतागढ, ता. नेपानगर, जि. खंडवा येथे पोहोचलीच नाही.

महिलेच्या नातेवाइकांचा देखील तिच्याशी अद्यापपर्यंत संपर्क होऊ शकलेला नाही. तिच्या आईने रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग क्र. १४/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात कोणतीही गुन्हेगारी बाब समोर आलेली नसली तरी महिलेचा अचानक गायब होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे: उंची ५ फूट, रंग गोरा, सडपातळ बांधा, हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचे ब्लाउज, चेहरा गोल, उजव्या मनगटावर “ॐ” गोंदलेले, चेहऱ्यावर लाल टिकली, आणि पायात काळ्या रंगाची लेदरची चप्पल. ती मोबाईल वापरत नाही व तिचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून रेल्वे पोलीस नागरिकांना आवाहन करत आहेत की, सदर महिलेबाबत कोणालाही काही माहिती असल्यास भुसावळ रेल्वे पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा. सार्वजनिक माध्यमांतून माहिती प्रसिद्ध केल्यास महिलेच्या शोधास मदत होऊ शकते, असा विश्वास रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.



