मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करूनही आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिल्याचे सांगितले असतानाही गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम होते.
मंगळवारी रात्री साधारण दहा वाजण्याच्या सुमारास आमदार संजय गायकवाड आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये बनियन आणि टॉवेल गुंडाळून आले होते. त्यांच्या हातात डाळीची एक पिशवी होती. कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला त्यांनी पिशवीतील डाळीचा वास घ्यायला सांगितला. काही शब्दांची देवाणघेवाण झाल्यानंतर गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आधी कानशिलात लगावली आणि नंतर थेट ठोसे मारले, यात तो कर्मचारी खाली पडला. उपस्थित काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत गायकवाड यांना तिथून बाजूला केले.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विधिमंडळात माध्यमांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी “पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. पोलीस याची चौकशी करतील. यासाठी कुणाचीही तक्रार येण्याची गरज नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील,” असे स्पष्ट केले. काही गुन्हे दखलपात्र असतात, तर काही अदखलपात्र, त्यानुसार कारवाई होईल आणि किती ताकद वापरली गेली यावर गुन्ह्याचे स्वरूप ठरते, असेही फडणवीस म्हणाले.
यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि आमदारांनी असे वर्तन करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संजय गायकवाड यांना समज दिल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या कृतीचे समर्थन करत, दक्षिण भारतातील लोकांनी महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याशी खेळ चालवला असल्याची प्रतिक्रिया दिली होती. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने या प्रकरणाला नवे वळण आले आहे.



