
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केटरिंगच्या कामाच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका तरुणासह त्याच्या मावशीवर धारदार शस्त्र आणि लोखंडी पाईपने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बुधवार, ९ जुलै रोजी रात्री ९:३० वाजता के.सी.पार्क परिसरात घडली आहे. या हल्ल्यात प्रवीण उर्फ सोनू देवरे आणि त्याची मावशी रेखा जगदीश खत्री (वय ४८, रा. जोशीवाडा, जळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, एकूण पाच जणांविरोधात गुरुवारी १० जुलै रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोशीवाड्यात राहणाऱ्या रेखा खत्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या ९ जुलै रोजी रात्री आपला मुलगा संजय खत्री याच्यासोबत, के.सी.पार्क येथे त्यांच्या बहिणीचा मुलगा प्रवीण देवरे याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. प्रवीण आणि संजय गप्पा मारत असताना, संशयित आरोपी ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका, भावेश सपकाळे, रोहित धुमाळ आणि तुषार खंडागळे (सर्व रा. जळगाव) हे प्रवीणजवळ आले. केटरिंगच्या कामाचे पैसे देण्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला.
या वादानंतर, पाचही जणांनी चाकू, कोयता आणि लोखंडी पाईपने प्रवीणवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रवीणच्या छातीवर, डोक्यावर आणि पाठीवर गंभीर वार झाल्याने तो जबर जखमी झाला. आपल्या भाच्याला मारहाण होत असल्याचे पाहून रेखा खत्री भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेल्या असता, त्यांनाही हातावर लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी करण्यात आले. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी रेखा खत्री यांच्या फिर्यादीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्यात वरील पाचही संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील तिघांना अटक केली असून, पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा या करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



