Home Cities अमळनेर आ. अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

आ. अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरमध्ये सामाजिक उपक्रमांनी सजलेला अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, विविध लोकोपयोगी कार्यक्रमांनी जनतेच्या मनात आमदाराबद्दलचा आदर अधिक वृद्धिंगत केला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांनी अमळनेरचा परिसर सणासारखा उजळून निघाला.

आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी उसळली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याभरातून आलेल्या नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, महिला आणि शेतकरी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले. आमदार निवासस्थानाबाहेर शुभेच्छांचा ओघ इतका होता की वातावरण उत्सवमय झाले होते.

वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रमांची रेलचेल दिसून आली. यात विशेषत्वाने रुग्णसेवेसाठी एक अत्याधुनिक रुग्णवाहिका आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ आणि जयश्री पाटील यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आली. ही रुग्णवाहिका बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली असून, परिसरातील रुग्णांसाठी ती मोठा दिलासा ठरणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातही उपयुक्त असा उपक्रम यावेळी पार पडला. तहसील कार्यालयासमोरील गुंजाळ झेरॉक्स येथे १५०० वह्यांची ‘वहीतुला’ करण्यात आली, ज्याचे वितरण गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रसन्ना जैन, गजु गुंजाळ, सतीश पारख व सुनील जैन यांनी हा उपक्रम राबवला होता. आमदार अनिल पाटील यांनी याचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाला हातभार लावणारा उपक्रम असल्याचे नमूद केले.

आरोग्य क्षेत्रातील योगदान म्हणून, धुळे व जळगाव येथील रक्तपेढ्यांच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरात एकूण १३८ युनिट रक्त संकलित झाले. या शिबिराला युवकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्याचबरोबर अपंग बांधवांसाठी व्हीलचेअर व कर्णयंत्रांचे वाटपही करण्यात आले, जे समाजातील दुर्बल घटकांना दिलासा देणारे ठरले.

कालानुरूप बदल स्वीकारत, काली पिली टॅक्सी युनियनतर्फे सहा नव्या मारुती इको टॅक्सीचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी जळगाव पीपल्स बँकेचे आर्थिक सहकार्य लाभले. प्रवाश्यांच्या सुविधेसाठी ही टॅक्सी सेवा अधिक सक्षम होणार असून, चालक-वाहकांनी आमदारांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

या दिवशी अनेक पक्षांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत, राजकीयदृष्ट्या देखील दिवस महत्त्वपूर्ण ठरला. शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात बॅनर आणि कमानी लावून कार्यकर्त्यांनी सोहळ्याला शोभा दिली.


Protected Content

Play sound