Home धर्म-समाज पारोळ्यातून उद्या निघणार ‘चलो कनाशी’ पायी दिंडी सोहळा !

पारोळ्यातून उद्या निघणार ‘चलो कनाशी’ पायी दिंडी सोहळा !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।भडगाव तालुक्यातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र कनाशी येथे यावर्षीही पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेली १९ वर्षांपासून (२००७ पासून) अखंडपणे सुरू असलेला हा दिंडी सोहळा, उद्या, बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी रात्री ९ वाजता पारोळ्यातील चैतन्य बुधनाथ महाराज मठ येथून प्रस्थान करणार आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गोविंद प्रभू यांच्या दहाडचे विशेष दर्शन वर्षातून एकदाच होत असल्याने या पायी दिंडी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. याच दर्शनाचा लाभ घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिंडीत शेकडो भाविक सहभागी होणार आहेत.

दिंडीमार्गावर भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयोजकांनी विशेष व्यवस्था केली आहे. रस्त्यात मुक्या प्राण्यांपासून त्रास होऊ नये यासाठी डीजेची सोय करण्यात आली आहे. तसेच, दिंडीमार्गावर ठिकठिकाणी भाविकांना चहा, दूध, कॉफी, केळी आणि नाश्ता यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या पवित्र पायी दिंडी सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवक पी. जी. पाटील (मो. ९९२३१२३८१२) यांनी केले आहे. हा सोहळा श्रद्धा आणि एकजुटीचे प्रतीक मानला जातो.


Protected Content

Play sound