
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इंदौर-छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद एल ७५३ राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली. यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावर काही व्यापारी आणि नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम थांबले होते. स्थानिक प्रशासनाने अनेकदा नोटिसा बजावूनही ही अतिक्रमणे हटवली जात नव्हती. त्यामुळे आज तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली.
या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी ठाण मांडून होते. तब्बल २०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बंदोबस्तास तैनात करण्यात आला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे कोणताही तणाव निर्माण न होता ही कारवाई शांततेत पार पडली. सकाळी अकरा वाजता मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच, अनेक दुकानदारांनी आपली दुकाने स्वतःहून हटवण्यास सुरुवात केली.
या कारवाईमुळे व्यवसायिक आणि छोट्या-मोठ्या धंदेवाल्यांची तारांबळ उडाली असली तरी, त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. दरम्यान, या ठिकाणी असलेला वनविभागाचा तपासणी नाका तात्पुरता हटवण्यात आलेला नाही. वनविभागाकडून पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर ते अतिक्रमणही हटवले जाईल असे सांगण्यात आले.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू राहण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. प्रशासनाकडून अशाच प्रकारे उर्वरित अतिक्रमणे हटवण्यासाठीही लवकरच पावले उचलली जातील, असे सूत्रांनी सांगितले आहे.



