Home राजकीय धुळ्यात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ : पीएच्या रूममध्ये सापडले घबाड, अनिल गोटेंचा ठिय्या

धुळ्यात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ : पीएच्या रूममध्ये सापडले घबाड, अनिल गोटेंचा ठिय्या

0
153

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी आमदार अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील रूममध्ये असलेले मोठे घबाड पकडून दिले असून यामुळे खळबळ उडाली आहे.

धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या खोली क्रमांक १०२ मध्ये तब्बल एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांची रोकड आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत या रक्कमेची मोजणी करण्यात आली आणि त्यानंतर तात्काळ ती खोली सील करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात राजकीय खळबळ उडाली असून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

माजी आमदार अनिल गोटे यांनी दावा केला आहे की, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीच्या दौर्‍यासाठी आलेल्या ११ आमदारांना वाटप करण्यासाठी ही रक्कम ठेवण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत तातडीने तपासाची मागणी केली. त्यांच्या सतर्कतेमुळेच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले, असे बोलले जात आहे.

रात्री ११ वाजता प्रांताधिकारी रोहन कुवर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर.आर. पाटील, शिवसेना (ठाकरे गट) नेते नरेंद्र परदेशी आणि कॅमेरामन माळी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. अधिकाऱ्यांनी खोलीचे कुलूप तोडून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर रुपयांच्या नोटा सापडल्या. नोटांची मोजणी करण्यासाठी तात्काळ मशीन मागवण्यात आले.

या रोकड रकमेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून राजकीय फायद्यासाठी रोख रक्कम वापरण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, अधिकृत स्तरावर अद्याप कोणतीही अंतिम माहिती समोर आलेली नसली तरी या घटनेमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

धुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून या रोकडमागचा मुख्य सूत्रधार कोण हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही रक्कम नेमकी कुणाची, कुठून आली, आणि काय हेतू होता – याचा खुलासा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


Protected Content

Play sound