Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पीएलसी व ड्रोन टेक्नोलॉजीवर कार्यशाळा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पीएलसी व ड्रोन टेक्नोलॉजीवर कार्यशाळा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील यंत्र व विद्युत विभागातर्फे ६ मे ते १० मे या दरम्यान बेसिक पीएलसी (Programmable Logic Controller) आणि ड्रोन टेक्नोलॉजी या महत्त्वपूर्ण विषयांवर पाच दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IIC) आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल (IQAC) यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

कार्यशाळेच्या पहिल्या दोन दिवसांत (६ मे ते ७ मे) पीएलसी ऑटोमेशनवर विशेष प्रशिक्षण आयोजित केले गेले. या सत्रात जळगावमधील नामांकित संस्था इलेक्ट्रोसॉफ्ट सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख मार्गदर्शक श्री. निलेश वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी पीएलसीची मूलभूत माहिती, रिलेचे कार्य आणि पीएलसीच्या प्रत्यक्ष हाताळणीचे प्रात्यक्षिक अनुभवले. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुश बटण स्विचेस पीएलसीला जोडून प्रत्यक्ष सर्किट तयार केले आणि त्यानंतर मोटर कंट्रोलिंग सिस्टीम बनवून तिचे कार्यान्वयन पाहिले. या कार्यशाळेत इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ज्यांना औद्योगिक ऑटोमेशनमधील अद्ययावत ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव प्राप्त झाला.

कार्यशाळेच्या पुढील तीन दिवसांत (८ मे ते १० मे) ड्रोन टेक्नोलॉजीवर आधारित प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील थर्ड ॲक्सिस ड्रोन क्लबच्या तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ आणि स्पर्धात्मक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली. या पुरस्कारप्राप्त टीममधील आदित्य बडगुजर (कर्णधार, संशोधन व विकास प्रमुख), अनुज टाकोटे (उपकर्णधार, डिझाइन व विश्लेषण प्रमुख), प्रांजल सोनवणे (एव्हिऑनिक्स प्रमुख) आणि कौशल राऊत (मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग प्रमुख) या सदस्यांनी विद्यार्थ्यांना ड्रोनचे असेंब्ली, फ्लाइट कंट्रोल, सॉफ्टवेअर व वायरलेस कंट्रोलिंग आणि प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण यावर सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना ड्रोनशी संबंधित अनेक तांत्रिक बाबींचा थेट अनुभव घेता आला.

कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील थर्ड ॲक्सिस ड्रोन लॅबला अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे ड्रोन्स, त्याचे सुटे भाग, आवश्यक सॉफ्टवेअर आणि अत्याधुनिक थ्रीडी प्रिंटिंग मशीन याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेतली.

या पाच दिवसांच्या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि ‘हँड्स-ऑन’ अनुभव प्राप्त करण्याची संधी मिळाली. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना उद्योगजगातील अत्यावश्यक कौशल्यांची ओळख करून देण्यात महत्त्वपूर्ण ठरली.

या यशस्वी कार्यशाळेच्या आयोजनात कार्यक्रम समन्वयक प्रा. अमित म्हसकर, प्रा. सचिन महेश्री व प्रा. किशोर महाजन तसेच विद्युत विभाग प्रमुख प्रा. महेश पाटील आणि यंत्र विभाग प्रमुख प्रा. तुषार कोळी यांनी उपप्राचार्य प्रा. प्रवीण फालक आणि प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय योगदान दिले. या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, सचिव डॉ. वर्षा पाटील मॅडम, सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम आणि डॉ. अनिकेत पाटील सर यांनी आयोजकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यार्थिनी श्रुती सोनार, तरन्नुम पिंजारी, हर्षा धांडे आणि गायत्री गोंड यांनी उत्कृष्टपणे केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तांत्रिक विषयांबद्दलची त्यांची उत्सुकता यामुळे ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली.


Protected Content

Play sound