Home Cities जळगाव शेतकरी आणि पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; नाविन्यपूर्ण योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

शेतकरी आणि पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; नाविन्यपूर्ण योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधव तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2025-2026 या वर्षासाठी नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभ योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी 2 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

या योजनांतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, 1 हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेडसाठी अर्थसाहाय्य, 100 कुक्कुट पिलांचे वाटप तसेच 25+3 तलंगा गट वाटप यांचा समावेश आहे. या सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केली जाणार आहे.

विशेष बाब म्हणजे, सन 2021-2022 पासून तयार करण्यात आलेली प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षे म्हणजे 2025-26 पर्यंत लागू राहणार आहे, त्यामुळे योजनेसाठी अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. अर्जदाराने एकदाच अर्ज केला असल्यास तो यादीत कायम राहील.

अर्जाची प्रक्रिया https://ah.mahabms.com या अधिकृत संकेतस्थळावर किंवा AH-MAHABMS या मोबाईल अ‍ॅपवर (प्ले स्टोअरवर उपलब्ध) पार पडणार आहे. अर्जाची स्थिती अर्जदाराच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याने अर्ज करताना दिलेला मोबाईल क्रमांक अचूक व कायमचा असावा, असा सल्ला विभागाने दिला आहे.

डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन या पैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, याची निवडही अर्जदार करू शकतो. तसेच मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी यंदा पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास टोल फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधावा, किंवा आपल्या तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound