Home Cities जळगाव सेवा आणि विश्वासाचा नवा अध्याय: जळगावात पंजाब अँड सिंध बँकेचे पदार्पण

सेवा आणि विश्वासाचा नवा अध्याय: जळगावात पंजाब अँड सिंध बँकेचे पदार्पण


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरात आज पंजाब अँड सिंध बँकेच्या पहिल्या शाखेचे भव्य उद्घाटन झाले. सेवा आणि विश्वासाचा वारसा घेऊन आलेल्या या बँकेने भारतात आपली १६६१ वी शाखा सुरू करत जळगावकरांच्या आर्थिक विकासात मोलाची भर घालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

उद्घाटनाची सुरुवात स्थानिक गुरुद्वारात ग्रंथीजींच्या मधुर अरदास आणि पंच प्याऱ्यांच्या आशीर्वादाने झाली. श्रद्धेने भारलेल्या वातावरणात प्रसाद वाटप करण्यात आले, ज्यामुळे बँकेने समुदायाशी आपुलकीचे बंध निर्माण केले.

उद्घाटन समारंभात जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखते यांनी फीत कापली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर अतुल भवरलालजी जैन यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

मुंबई झोनचे आंचलिक प्रबंधक सरबजीत सिंह यांनी बँकेच्या विविध कर्ज योजना व बचत/चालू खाते सुविधांची माहिती दिली. त्यांनी ग्राहकांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेची कटिबद्धता स्पष्ट केली. शाखा प्रबंधक रविंद्र यादव यांनी उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्याने जळगावच्या आर्थिक क्षेत्रात एक नवीन उमेद निर्माण केली आहे. ही शाखा केवळ आर्थिक व्यवहारांचे केंद्र न राहता, जळगावच्या विकासाच्या प्रवासात एक विश्वासू भागीदार ठरणार आहे.


Protected Content

Play sound