Home Cities जळगाव बँकांसह शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा सक्तीने वापर करा; मनसेचे निवेदन

बँकांसह शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा सक्तीने वापर करा; मनसेचे निवेदन

0
107


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बँका तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा सक्तीने वापर करण्यात यावा, तसेच मराठी न येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे, या मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) दिनांक २१ जून २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्रातील सर्व बँकांनी स्थानिक भाषेत, म्हणजेच मराठीमध्ये ग्राहकांशी व्यवहार करणे बंधनकारक आहे. मात्र, दुर्दैवाने जळगाव शहरातील अनेक बँकांमध्ये आजही हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर केला जातो आणि मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले जाते.

मनसेने या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा योग्य वापर होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.

यावेळी मनसेचे नेते आणि माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमीन देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, ललित शर्मा, शेतकरी सेनेचे प्रदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मराठी भाषेच्या अंमलबजावणीसाठी तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. बँका आणि शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर सुनिश्चित केल्यास सामान्य नागरिकांसाठी कामकाज अधिक सुलभ होईल, असे मत मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound