जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सदाशिव नगरातील ओम पान सेंटर समोर बेकायदेशीर पणे हातात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ४ जिवंत काडतूस घेवून परिसरात दहशत माजविणाऱ्या दोघांवर शनीपेठ पोलीसांनी मंगळवारी १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक असे की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदाशिव नगरातील ओम पान सेंटर समोर राकेश दिलीप भावसार वय ४१ रा. सदाशिव नगर आणि प्रसाद संजय महाजन वय २८ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव हे दोघेजण बेकायदेशीरपणे हातात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ४ जिवंत काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मंगळवार १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले, त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ४ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पराग दुसाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राकेश दिलीप भावसार वय ४१ रा. सदाशिव नगर आणि प्रसाद संजय महाजन वय २८ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सूरी हे करीत आहे.


