Home Cities जळगाव शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारात जिल्ह्यातील पाच खेळाडूंचा होणार सन्मान !

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारात जिल्ह्यातील पाच खेळाडूंचा होणार सन्मान !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार येत्या १८ एप्रिल रोजी पुण्यात आयोजित वितरण सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्ह्याने आपली दमदार उपस्थिती दर्शवली असून, तब्बल पाच खेळाडूंचा या मानाच्या पुरस्कारासाठी गौरव होणार आहे.

सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन वर्षांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा हा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित सोहळ्याला राज्याचे मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, दोन्ही मा. उपमुख्यमंत्री, मा. क्रीडा व युवक कल्याण मंत्री, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जळगाव जिल्ह्यासाठी ही अत्यंत गौरवाची बाब असून, निवड झालेल्या पाच खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर राज्याच्या क्रीडा नकाशावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. पुरस्कार प्राप्त खेळाडूंची वर्षानुसार नावे खालीलप्रमाणे आहेत: वर्ष २०२२-२३: अभिजीत दत्तात्रय त्रिफळकर – कॅरम, नेहा नितीन देशमुख – सॉफ्ट बॉल, जयेश यशवंतराव मोरे – सॉफ्ट बॉल, वर्ष २०२३-२४: रेखा पूना धनगर – बेस बॉल, प्रीतीश रमेश पाटील – सॉफ्ट बॉल

या सर्व खेळाडूंनी राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरही आपल्या खेळात उत्कृष्ट प्रदर्शन करत जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा मान वाढवला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल आणि क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound