
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यावल शहरात एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. यावल बस स्थानक परिसरात वाढत्या चोरी, पाकिटमारी आणि महिलांवरील छेडछाड यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना लक्षात घेता परिवर्तन फाउंडेशन यावल या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने स्थायिक पोलीस चौकी उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


या नियोजित पोलीस चौकीच्या जागेचे भूमिपूजन यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज सोनवणे आणि एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी आमदार जावळे यांचे स्वागत-सत्कार केला. या प्रसंगी यावल तालुका भाजपचे अध्यक्ष उमेश फेगडे, युवा मोर्चाचे भूषण फेगडे, संजू फिरके, माजी नगरसेवक रवी भिल्ल, कैलास पाटील तसेच एसटी आगाराचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावल बस स्थानकात गेल्या काही महिन्यांत महिलांचे दागिने चोरी जाणे, पाकिटमारी आणि शाळकरी मुलींची छेडछाड या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यामुळे महिला प्रवासी व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर परिवर्तन फाउंडेशनने पुढाकार घेत बस स्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी असावी यासाठी प्रयत्न सुरू केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून याची सुरुवात करण्यात आली असून, लवकरच पोलीस चौकी उभी राहील आणि आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते तिचे लोकार्पण करण्यात येईल, असे युवराज सोनवणे यांनी सांगितले. यावेळी आमदार अमोल जावळे म्हणाले, “परिवर्तन फाउंडेशनसारख्या दानशूर व समाजसेवी संस्थांनी जर प्रशासनाला सहकार्य केले, तर निश्चितच सुसूत्रता येईल आणि अशा विकृत घटनांना व चोरट्यांना लगाम बसेल.” या उपक्रमामुळे यावलकरांमध्ये एक नवा विश्वास निर्माण झाला असून, परिवर्तन फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


