
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील न्हावी येथील १८ वर्षीय तरुण दर्पण निलेश कोलते याचा पंढरपूर येथे चंद्रभागेच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दर्पण आपल्या तीन मित्रांसह आणि इतर ठिकाणच्या दोन अशा एकूण पाच मित्रांसोबत औरंगाबादहून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेला होता. ही दुर्दैवी घटना घडल्याने न्हावी गावात शोककळा पसरली असून, शोकाकुल वातावरणात आज दर्पणवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


न्हावी येथील मोलमजुरी करणारे कोलते कुटुंबीयांचा मुलगा दर्पण निलेश कोलते आणि त्याचे मित्र मनोज रघुनाथ कापडे, दिगंबर निलेश पवार (रा. रावेर, आयटीआय विद्यार्थी) तसेच चाळीसगाव व परडी येथील दोन तरुण असे पाच मित्र औरंगाबाद येथील गव्हर्नमेंट पॉलीटेक्निकल कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होते. तीन दिवसांची सुट्टी मिळाल्याने या पाचही मित्रांनी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला होता.
पंढरपूर येथे पोहोचल्यावर मनोज कापडे, दिगंबर पवार आणि दर्पण कोलते हे चंद्रभागेच्या पात्रात भक्त पुंडलिकाच्या मंदिराजवळ अंघोळीसाठी उतरले. नदीच्या पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दर्पणचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेला मनोजही बुडत होता, मात्र नदीकाठी बसलेल्या दिगंबर पवारने आरडाओरड केल्याने भाविक जमा झाले आणि त्यांनी तात्काळ मनोजला वाचवले. परंतु दर्पण पाण्यात बुडाल्याने सुमारे आठ तासांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आज, सोमवार सकाळी आठ वाजता दर्पणचा मृतदेह न्हावी गावात आणण्यात आला आणि शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्पण कोलते हा गरीब कुटुंबातील विद्यार्थी होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि आपल्या दोन मुलांचे शिक्षण सांभाळत होते. दर्पणच्या लहान भावाने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे, तर मोठा भाऊ औरंगाबाद येथे पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. अशा कठीण परिस्थितीत या तरुण विद्यार्थ्याचा अकाली मृत्यू झाल्याने न्हावी गावात सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे.


