जळगाव, प्रतिनिधी | भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हस्तिमल बंब आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी काल (दि.१२) जळगाव येथे भेट देवून समाजातील विविध समस्यांबाबत मार्गदर्शन केले. आपल्या जळगाव दौऱ्यात पी.पी.आर.एल. ग्रुपच्या कार्यालयात झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते.
यावेळी श्री. बंब म्हणाले की, जैन समाजातील विधवा आणि घटस्फोटीता महिलांचे पुनर्विवाह व्हावे, यासाठी अशा महिलांचे लवकरच जालना येथे एक संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्त समाजात जागृती निर्माण करण्यासाठी हे पदाधिकारी सध्या खान्देशच्या दौऱ्यावर आले आहेत. याशिवाय जैन समाजाला नुकताच अल्पसंख्यक समाज म्हणून दर्जा प्राप्त झाला असून त्याबद्दल सरकारकडून मिळणारे लाभ समाजातील गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठीही यानिमित्ताने जागृती केली जात आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्य टॅन्करमुक्त व दुष्काळमुक्त व्हावे, यासाठीच्या संघटनेने चालवलेल्या अभियानाचा आढावाही यात घेण्यात येत आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्यात चाळीसगाव, धुळे, नंदुरबार, अमळनेर व जळगाव या गावांना भेटी दिल्या. जळगाव येथील भेटीवेळी झालेल्या बैठकीत भारतीय जैन संघटना जळगावचे अध्यक्ष अशोक चोपडा (काकाजी), महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य विनय पारख, विजय चोपडा, प्रकाश कटारिया यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.