जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जळगावात महिलांसाठी आरोग्य शिबिर आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेड स्वस्तिक सोसायटी, एस.एच.जी. मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिक आणि नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवले जाणार आहेत.


जळगावातील महाबळ येथील रोटरी भवनात ७ मार्च रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांच्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाईल. कॅन्सर, हृदयरोग, मेंदू, मनका, अस्थिरोग यांसारख्या गंभीर आजारांची तपासणी आणि उपचार उपलब्ध असतील. महिलांना औषधोपचारासह आरोग्यसेवा पुरवली जाणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेड स्वस्तिक सोसायटीने केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचन भवनात ८ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी, डॉ. आनंदीबाई जोशी, स्व. प्रेमाबाई जैन यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातील. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समाजातील महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रेड स्वस्तिक सोसायटीने केले आहे.
याप्रसंगी अशोक शिंदे, नंदू रायगड, जी. बी. पाटील, डॉक्टर धनंजय बेंद्रे, दिलीप गवळी, नरेश चौधरी, एस.एच.जी. मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिक रिजनल हेड राहुल सूर्यवंशी, नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्ष मनीषा पाटील, उपाध्यक्ष वंदना माणिकचंद मंडावरे, नूतन तासखेडकर, डॉक्टर गणेश पाटील, कार्याध्यक्ष नूतन तासखेडकर आदी उपस्थित होते.


