Home राजकीय शरद पवारांकडून एकनाथ शिंदेचा सत्कार; ठाकरे गटात नाराजी

शरद पवारांकडून एकनाथ शिंदेचा सत्कार; ठाकरे गटात नाराजी


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांत मोठे बदल घडले आहेत. पारंपरिक शत्रुत्व असलेले पक्ष एकत्र येऊन बसले आहेत, तर अनेक जुनी राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. अशातच महायुतीने विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला असून, महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. या राजकीय घडामोडींमध्ये ठाकरे गट आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. यामुळे ठाकरे गटाच्या भावना दुखावल्या असून, खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे आम्हाला वेदना झाल्या आहेत. पवार साहेब, आम्हालाही राजकारण कळतं! महाराष्ट्राचं राजकारण विचित्र दिशेने जात आहे. ज्यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होतं.” राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात शत्रू-मित्र बदलत असतात, हे मान्य आहे, पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, अशा व्यक्तींना सन्मानित करणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की ही भावना केवळ ठाकरे गटाची नसून, महाराष्ट्रातील जनतेचीही आहे.

महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना म्हटलं, “गेल्या ५० वर्षांत नागरी प्रश्नांवर काम करणारा नेता म्हटलं तर एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले पाहिजे. महानगरपालिकेपासून राज्य सरकारपर्यंत त्यांनी नवी दिशा दाखवली आहे.” पुरस्काराच्या स्वरुपात एकनाथ शिंदे यांना ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी प्रदान करण्यात आली. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाचा संताप उफाळून आला आहे.


Protected Content

Play sound