जळगाव प्रतिनिधी । शासनाने राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू केली असून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जिल्हयात प्लॅस्टीक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज जिल्हा पर्यावरण समिती बैठकीमध्ये दिले. जिल्हा पर्यावरण समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पर्यावरण प्रशाला संचालक डॉ.एस.टी.इंगळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस.एम.कुरमुडे, शहर अभियंता एस.एस.भोळे, सहायक वनसंरक्षक के.आर.फड,समिती सदस्य बालरोग तज्ञ डॉ.हेमंत पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष विष्णू भंगाळे यावेळी उपस्थित होते. जिल्हास्तरावरील पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन तसेच पर्यावरणविषयक जनजागृतीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. प्लॅस्टीकऐवजी स्थानिक पर्यायी साधनांचा वापर करणे, त्यासाठी जनजागृती करणे, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करुन, बायोमेडीकल वेस्ट व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया कार्यक्षम करणे, नगर परिषद क्षेत्रातील भूमिगत गटार योजना पूर्ण करणे इत्यादी उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षणासाठी आमदार महोदयांनी यावेळी विविध मौलिक सूचना केल्या. या सूचनांचे पालन करुन आराखडा तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. बैठकीला संबधित विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.