
भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात असलेल्या राखेच्या ठेक्यावर दोन जणांनी सुपरवायझरला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून खिशातील ४ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून धमकी दिल्याची घटना २४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता घडली. या प्रकरणी गुरुवारी (३० जानेवारी) सायंकाळी ७ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुसरी शिवारात आसरामाता मंदिराजवळ राखेचा ठेका आहे. तिथे असिफ शब्बीर तडवी (वय २४, रा. मित्तल नगर, भुसावळ) हे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. २४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता ते ड्युटीवर असताना करण बेलदार आणि नितीन बेलदार (दोन्ही रा. वेल्हाळा, ता. भुसावळ) यांनी येऊन सुरुवातीला शिवीगाळ केली. त्यानंतर करण बेलदारने लोखंडी रॉडने तडवी यांच्या मानेवर मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील मोबाईल फेकून फोडून नुकसान केले आणि खिशातून ४ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून धमकी दिली.
या प्रकरणी जखमी झालेल्या आसिफ तडवी यांना वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी (३० जानेवारी) सायंकाळी ७ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी करण बेलदार आणि नितीन बेलदार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव करीत आहेत.


