चोपडा प्रतिनिधी । जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बारी समाज महासंमेलनाच्या आयोजनाबाबत आज येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.
फेब्रूवारीमध्ये जळगाव येथे अखिल भारतीय बरई-तांबोळी-चौरसिया-कुमरावत-बारी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासंमेलनाच्या आयोजनाबाबत येथील बारीवाड्यात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष रामदास बोडखे यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले की, समाजाच्या आर्थिक, राजकीय व सामाजिक विकासासाठी या महासंमेलनातून प्रयत्न केले जातील. सामाजिक एकजुट उभी केली जाउन समाजाची ताकद वाढवणे हा उद्देश्य आहे. यासाठी सर्व समाज बंधु-भगिनींची साथ आवश्यक असल्याते प्रतिपादन त्यांनी केले. तर कार्याध्यक्ष मनोज बारी यांनी संमेलनामागील भूमिका विषद करतांना देशभर विखुरलेल्या समाजातील बांधवांचा परिचय व्हावा, आपापासात विविध प्रकारचे व्यवहार व्हावेत व यातून एक शक्ती उभी रहावी. त्यातून समाज विकासाला चालना मिळावी अशी भावना व्यक्त केली.
या सहविचार सभेला समितीचे कार्याध्यक्ष मनोज बारी, सचिव रतन बारी, कोषाध्यक्ष जे.पी.धर्मे हे उपस्थित होते. तसेच चोपडा बारी पंच मंडळाचे अध्यक्ष किरण बारी, ज्येष्ठ समाज बांधव एम.के.बारी, एम.बी.बारी, अरुण कुकडे, शंकर मिस्तरी हे मंचावर उपस्थित होते. यावेळी चोपडा बारी समाज पंच मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.