Home Cities अमळनेर गटारी व रस्त्यांची दुरूस्ती करा, अन्यथा अपोषण; नगरपरिषदेला इशारा

गटारी व रस्त्यांची दुरूस्ती करा, अन्यथा अपोषण; नगरपरिषदेला इशारा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे रोडवरील कॉटन मार्केटच्या मागे वसलेल्या गुरुकृपा कॉलनीतील रहिवाशांनी अमळनेर नगरपरिषदेकडे रस्ते आणि गटार दुरुस्तीची मागणी केली आहे. कॉलनीतील समस्यांबाबत नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्या पुर्ण न झाल्यास स्थानिक रहिवाशांकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुकृपा कॉलनी ही १९९९ पासून अस्तित्वात असली तरी, आजपर्यंत विकासाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. विशेषतः भालेराव नगरला लागून असलेल्या तीन गल्ल्यांमध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत. रस्त्यांची अवस्था दयनीय असून, गटारी देखील जीर्ण अवस्थेत आहेत. गटारी ठिकठिकाणी तुटलेल्या असल्याने पाण्याचा योग्य निचरा होत नाही, परिणामी परिसरात डबकी साचून राहतात. या डबक्यात साप आणि इतर विषारी जीव वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि गटारींची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने स्थानिक रहिवाशांच्या मागण्या पुर्ण न केल्यास नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागण्या पुर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर हरीचंद्र कढरे, वसंत काटे, राजू कांबळे, सुदाम बाविस्कर, सचिन संदानशिव, विशाल सोनवणे, मानस ठाकरे, सुरेश संसारे, निंबा मैराळे यांच्यासह अनेक रहिवाशांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound