धनाजी नाना महाविद्यालयात व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकास कार्यशाळा

सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा येथील धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजित विद्यापीठस्तरीय तीन दिवसीय “व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकास कार्यशाळेत” दिनांक 18 जानेवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात डॉ.संजय पाटील यांनी “पुस्तकांच्या जगातून व्यक्तिमत्व खुलताना” या विषयावर मार्गदर्शन केले. पुस्तक माणसाचे खरे मित्र असतात, पुस्तकातून नेहमीच आदर्श व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते, परंतु आपण कशा प्रकारची पुस्तके वाचले पाहिजे याचे भान असणे महत्वाचे आहे. पुस्तके वाचल्याने व्यक्तींची निर्णय क्षमता, भाषा शैली, आणि विचार करण्याची पद्धत यात अमुलाग्र बदल होत असतो, एकंदरीतच व्यक्तिमत्व विकासात पुस्तकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे प्रतिपादन प्रा. संजय पाटील, विभागीय समन्वयक विद्यार्थी विकास विभाग व अध्यक्ष, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, कबचौउमवि, जळगाव यांनी केले.

दिवसभरात प्रा. उत्पल चौधरी व डॉ. एस.एस. पाटील यांनी “मी पाहिले नेतृत्व घडताना” या विषयावर खानदेशातील स्वातंत्र्यसैनिक व ग्रामीण भागातील तत्कालीन शूरवीरांच्या कथा सांगत स्वातंत्र्यसंग्रामात कामी आलेल्या नेत्यांवर डॉक्युमेंटरी व ऐतिहासिक दस्तावेज दाखवून त्यांच्या कार्याची माहिती दिली. दुपारून दुसऱ्या सत्रात डॉ.मुकेश चौधरी यांनी “नेतृत्व आणि व्यक्तिमत्वाची सांगड घालताना” या विषयावर मार्गदर्शन केले, नेतृत्व करत असताना व्यक्तिमत्व स्वच्छ,निरपेक्ष, प्रामाणिक असणे गरजेचे आहे.

कोणताही भेदभाव न करता तटस्थपणे निर्णय घेण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्त्वामध्ये असेल त्याचे नेतृत्व हे जगमान्य होत असतं आणि अशा नेतृत्वाला जागतिक दर्जाची ख्याती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन प्रा.डॉ.मुकेश चौधरी यांनी केले. सायंकाळी विविध खेळ, व “महाविद्यालयीन जीवनात नेतृत्व विकास कसा साधावा” या विषयावर गटचर्चा व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात पावरी गीत, तबला, ढोलकी वादन, एकपात्री अभिनय, आदिवासी गीत, सामाजिक विषयांवर नाटिका सादर करण्यात आल्या. दिवसभराच्या विविध कार्यक्रमासाठी व्यवस्थापन, कार्यशाळा समन्वयक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे यांनी केले, त्यांसाठी त्यांचे सहकारी प्रा.शिवाजी मगर, डॉ.जयश्री पाटील,प्रा.अचल भोगे, डॉ.ताराचंद सावसाकडे, डॉ.राजेंद्र राजपूत, डॉ.राकेश तळेले, डॉ.पल्लवी तायडे, डॉ.आरती भिडे, भूषण चौधरी, श्रीराम कोळी, धनंजय माळी यांनी सहकार्य केले.

Protected Content