अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरात बुधवारी १५ जानेवारी रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने १० ते १२ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पीडितांमध्ये ४ ते ५ लहान मुले तसेच काही तरुणांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींना गंभीर जखमांमुळे धुळे येथे तातडीने उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पिंपळे रोडवरील जे डी सी सी बँक कॉलनी, श्रीकृष्ण नगर, आल्हादनगर, सुंदरनगर, वर्धमान नगर, वामन नगर या भागांतील नागरिकांवर हा प्रकार घडला आहे.
घटनेनंतर स्थानिक माजी नगरसेवक विवेक पाटील आणि काही नागरीकांनी तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना व आरोग्य निरीक्षकांना माहिती दिली. मात्र, प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त होऊ शकला नाही आणि नागरिकांचा रोष वाढला आहे.
पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरातील लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाणेही असुरक्षित वाटत आहे. या संदर्भात नगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.