जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य सरकार दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस पहिल्या ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करते. या निमित्ताने जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (वीफा) मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धा, चर्चासत्रे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडाविकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन कटिबद्ध आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून खेळाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खाशाबा जाधव यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी खेळाडूंना जाधव यांचा आदर्श अंगीकारण्याचा सल्ला दिला, ज्याला खेळाडूंनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व खेळाडूंनी खाशाबा जाधव यांच्या प्रमाणे क्रीडाक्षेत्रात उत्कृष्टता गाठण्याचा निर्धार केला. कार्यक्रमादरम्यान फुटबॉल संघटना आणि स्पोर्ट्स हाऊसतर्फे उपस्थित खेळाडूंना स्टॉकिंग, क्रीडा साहित्य आणि मिठाई वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे सचिव फारुक शेख, हेड कोच राहील अहमद, प्रकल्प संचालक वसीम रियाज, प्रशासकीय प्रमुख हीमाली बोरोले, कार्याध्यक्ष डॉ. अनिता कोल्हे आणि ॲड. आमिर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.