अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषदेकडून प्लास्टिक बंदीबाबत पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली. १४ जानेवारी जी झालेल्या या मोहिमेत बंदी असलेल्या प्लास्टिकपासून तयार केलेल्या पतंगांची विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्या चार दुकानदारांना ६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यावेळी एकूण ८.५ किलो प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आल्या.
नगरपरिषद आरोग्य विभागाच्या भरारी पथकाने एम.एस. किरणा, धर्मेंद्र कटारिया, जुने बस स्थानक परिसर, महेश कटलरी, गंगा घाट आणि बाफना जनरल स्टोअर आदी ठिकाणी छापे टाकले. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पतंग हस्तगत करण्यात आल्या. मुख्याधिकारी वेवो तोलू केझो (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी देखील दोन दिवसांपूर्वी प्लास्टिक बंदीची मोहिम राबवण्यात आली होती. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे, शहर समन्वयक गणेश गढरी आणि पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी वेवो तोलू केझो यांनी नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले. तसेच नायलॉन मांजाचा वापर थांबवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.