जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील पिरजादे वाडा परिसरातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी १३ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता कारवाई करत जप्त केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील मेहरून भागातील पिरजादेवाडा या परिसरामधून अवैधपणे वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. पथकाने सोमवारी १३ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी ४ वाजता ट्रॅक्टरचालक विशाल विक्रम भिल रा. शिरसोली ता.जळगाव आणि रोहिदास गणपत राठोड रा. उमराव लॉन्स, जळगाव या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर करीत आहे.