धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील भवानीनगर, पारोळा नाका परिसरातील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. २०२३ पासून नागरिकांनी वारंवार निवेदने आणि मागण्या सादर करूनही नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सोमवारी १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नागरीकांनी संताप व्यक्त करत मुलभूत सुविधा द्यावात अन्यथा धरणगाव नगरपालिका समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा अपुरा पुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव आणि इतर मूलभूत सुविधांची समस्या अद्याप कायम आहे. प्रशासनाने वारंवार आश्वासनं दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, संतप्त नागरिकांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. “जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील, तर आम्हाला मतदानाचा अधिकार वापरण्याची गरज नाही,” असे नागरिकांनी ठामपणे सांगितले. याशिवाय, भवानीनगरमधील नागरिकांनी नगरपालिका टॅक्स आणि कमिटी पावत्या भरण्यास देखील नकार दिला आहे. “आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळत नाही, तर आम्ही टॅक्स का भरायचा?” असा सवाल उपस्थित नागरीकांनी केला आहे.
भवानीनगर परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरीकांनी केला आहे. नागरिकांचा वाढता असंतोष आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेतं, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.