महाकुंभ 2025 : किन्नर अखाडा ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू !

प्रयागराज-वृत्तसेवा । महाकुंभ हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 40 कोटींहून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या भव्य मेळाव्याचे केंद्रबिंदू म्हणजे संगमावर पवित्र स्नान करणारे 13 प्रमुख अखाडे. यामध्ये एक नाव विशेषत्वाने चर्चेत आहे ते म्हणजे किन्नर अखाडा !

किन्नर अखाड्याचा इतिहास आणि स्थापना
किन्नर अखाड्याची स्थापना 2015 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या आणि किन्नर अ‍क्टिविस्ट डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केली. किन्नर समुदायाला धार्मिक आणि सामाजिक हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी या अखाड्याचा पाया घातला. 2016 मध्ये उज्जैनच्या सिंहस्थ कुंभमध्ये किन्नर अखाड्याने पहिल्यांदा सहभाग घेतला. त्या वेळी अखिल भारतीय अखाडा परिषदेने या नवीन अखाड्याला विरोध दर्शवला होता. परंतु, डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या धैर्यामुळे किन्नर अखाड्याला मान्यता मिळाली आणि त्यांचे शाही स्नान झाले.

जूना अखाड्याशी संबंध
2019 च्या कुंभ मेळाव्यापूर्वी, किन्नर अखाड्याने जूना अखाड्याशी सामंजस्य करार केला. या करारानुसार, किन्नर अखाडा जूना अखाड्यासोबत शाही स्नानात सहभागी होणार आहे. यामुळे इतर अखाड्यांचे दृष्टिकोनही बदलले आणि किन्नर अखाड्याला अधिक स्वीकृती मिळाली. यानंतर हा अखाडा विस्तारला. यात आता अनेक महामंडलेश्वर देखील आहेत.

अखाड्याचे आराध्य दैवत अर्धनारीश्वर !
किन्नर अखाड्याचे आराध्य दैवत अर्धनारीश्वर आणि बउचरा महाराज आहेत. किन्नर संत आपल्या प्रत्येक धार्मिक विधीची सुरुवात या दैवतांच्या पूजनाने करतात.

भारतीय समाजात किन्नरांचे महत्त्व
भारतीय संस्कृतीत किन्नरांना शुभ मानले जाते. त्यांची उपस्थिती आनंददायक आणि मंगलकारी मानली जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये किन्नरांना विशेष स्थान देण्यात आले आहे. भगवान शिवाचे भक्त असलेल्या किन्नरांना आशीर्वाद देणारे आणि शुभ संकेत देणारे मानले जाते.

किन्नर अखाड्याचा अध्यात्मिक आणि सामाजिक उद्देश
किन्नर अखाड्याचे प्रमुख उद्दिष्ट किन्नर समुदायाला समाजात समान अधिकार मिळवून देणे आहे. या अखाड्याद्वारे किन्नर समुदायाच्या आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक अधिकारांचे संरक्षण केले जाते. महाकुंभादरम्यान, किन्नर अखाडा विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतो. त्यांच्या परंपरागत प्रथा आणि अध्यात्मिक ज्ञान यांद्वारे ते आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतात.

अखाड्याची जागतिक स्तरावर ओळख
डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी किन्नर अखाड्याला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प केला आहे. थायलंड, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका, फ्रान्स, रशिया आदी देशांमधील 200 पेक्षा अधिक ट्रान्सजेंडर व्यक्तींना किन्नर अखाड्यात समाविष्ट केले जाणार आहे.

ट्रान्सजेंडर हक्कांसाठी सक्रिय
डॉ. त्रिपाठी यांनी ट्रान्सजेंडर समुदायासाठी शिक्षण, रोजगार आणि समान हक्कांसाठी सरकारला जागरूक करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, समाजातील भ्रांत्या दूर केल्याशिवाय ट्रान्सजेंडर समुदायाला संपूर्ण सन्मान मिळू शकणार नाही. महाकुंभातील किन्नर अखाडा हा अध्यात्म, परंपरा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. किन्नर अखाड्याने सामाजिक बदल घडविण्यासाठी आणि किन्नर समुदायासाठी नवा मार्ग उभारण्यासाठी आपले स्थान निर्माण केले आहे.

महाकुंभमध्ये अनोखी संधी
महाकुंभ 2025 मध्ये किन्नर अखाडा हा लाखो भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यांच्या पवित्र स्नानाची परंपरा, धार्मिक विधी, आणि आध्यात्मिक संदेश यामुळे किन्नर अखाडा यंदाही सर्वांचे लक्ष वेधून घेईल. महाकुंभ 2025 हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. किन्नर अखाड्याच्या माध्यमातून किन्नर समुदायाच्या संघर्षाचे, त्यांच्या परंपरांचे आणि आध्यात्मिक योगदानाचे दर्शन घडते. महाकुंभात किन्नर अखाड्याची भव्यता अनुभवणे ही एक अनोखी संधी ठरेल.

Protected Content