यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक धोरण २०२० यासंदर्भात मुख्याध्यापिका कल्पना महाजन (सेमी इंग्लिश स्कूल) व मुख्याध्यापिका दिपाली धांडे (इंग्लिश मडियम स्कूल) यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सुधीर कापडे व प्रा. इमरान खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. डॉ. सुधीर कापडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० हे भारताचे तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असून या शैक्षणिक धोरणात १९६८ व १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये कुठल्या प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीच्या शैक्षणिक परिघातील विविध क्षेत्रातील आपल्या आवडत्या विषयासंदर्भात रुची निर्माण करणारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण असणार आहे असे सांगितले.
प्रा. इमरान खान यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या अद्वितीय क्षमतेचा विकास करणारे शिक्षण असेल असे सांगितले यासोबतच अभ्यासक्रमात व प्रवेश प्रक्रियेत लवचिकता बहुभाषिकता व्यवसाय आणि रोजगारक्षम इत्यादी वैशिष्ट्यांचा शैक्षणिक धोरण समावेश आहे असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला विद्यालयीन शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.