धनाजी नाना महाविद्यालय येथे ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम

सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे ग्रंथालय आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनसंकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत “ लेखक आपल्या भेटीला ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमा अंतर्गत छत्रपती संभाजी नगर येथील कवयित्री तथा लेखिका सौ. माधवी महेंद्र चौधरी तसेच भुसावळ येथील कला विज्ञान आणि पु. ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालयातील प्रा डॉ. के. के. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कवयित्री माधुरी चौधरी यांनी आठ ओळींच्या कवितेमध्ये किती सामर्थ्य असते याचे महत्त्व विशद केले. ज्या गोष्टी आपण इतरांना बोलू शकत नाही त्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांसमोर मांडता येते. विद्यार्थ्यांनी कविता करणे किंवा लिहिणे खूप महत्त्वाचे आहे. वाचनासोबत लेखनही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. तर प्रा. डॉ. अहिरे सरांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत वाचन केले. त्यांनी आपल्या आयुष्यात ग्रंथांवर जीवापाड प्रेम केले. विद्यार्थ्याचे जीवन सुसंस्कृत तथा सुखमय होण्यासाठी पुस्तकांवर प्रेम करून प्रत्येक दिवशी नियमितपणे वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा तापी परिसर विद्या मंडळाचे नियामक मंडळ सदस्य प्रा. डॉ. जी. पी. पाटील होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात मोबाईल आणि टेलिव्हिजनचे दुष्परिणाम कसे व किती प्रमाणात होत आहे ते सोदाहरण स्पष्ट केले. त्यामुळे या गोष्टीपासून सावध राहून वाचनाची आवड निर्माण करावी असे सांगितले. प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. आय. जी. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन तथा आभार प्रा. विजय तायडे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. महेंद्र चौधरी,छत्रपती संभाजीनगर, प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. डॉ. आय. पी.. ठाकूर, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, प्रा. डॉ. एस. एल. बिऱ्हाडे, उमाकांत पाटील सर, प्रा. प्रिया बारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी आयोजकांचे अभिनंदन आणि कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालय विभागातील सहर्ष चौधरी, सुरेखा सोनवणे, यामिनी पाटील, यांनी परिश्रम घेतले.

Protected Content