मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारतामध्ये एचएमपीव्हीचे रूग्ण समोर येत असताना आता चिंता वाढली असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. हा विषाणू नवा नाही पण आता पुन्हा त्याचा चंचूप्रवेश झाला आहे. याबाबत लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातल्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक आहे. त्यानुसार लवकरच आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी केली जातील असे त्यांनी म्हटले आहे.
एचएमपीव्ही या व्हायरसला घाबरण्याचं कारण नाही. प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही, यापूर्वीही हा व्हायरस आला आहे. पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसतो आहे. यासंदर्भात जी नियमावली आहे ती जाहीर होईल. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांना माहिती देण्याचे ठरवले आहे. या व्हायरसला घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात कपोलकल्पित माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल ती माहितीच द्यावी. आरोग्य विभागाची बैठक झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक चालू आहे, असे सांगितले आहे.
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.