राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागाला विजेतेपद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नागपूर येथे दिनांक ३ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. आदिवासी विकास विभागाच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नाशिक विभागाने सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावत आपल्या अफाट क्रीडा कौशल्याची झलक दाखवली. ४ विभागांतील जवळपास १९०० खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धा अधिक चुरशीची झाली. नाशिक विभागाच्या खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत या स्पर्धेचा प्रमुख आकर्षण ठरले.

स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ३ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भव्य समारंभात संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी खेळाडूंना उद्देशून “खेळ जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, शिस्त, आणि संघभावना शिकवतात,” असे सांगत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. समारोप व पारितोषिक वितरण समारंभात राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री उईक यांनी विजेत्या खेळाडूंना सन्मानित करत त्यांची प्रशंसा केली. या दोन्ही नेत्यांनी आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील तरुणांना संधी मिळत असल्याचे कौतुक केले.

या स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलच्या एकूण २९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला, ज्यापैकी तब्बल २६ खेळाडूंनी पदके जिंकून प्रकल्पाचा सन्मान वाढवला. या खेळाडूंनी वैयक्तिक प्रकारात २३ पदके, तर सांघिक प्रकारात ३ पदके जिंकत आपली चमक दाखवली.

नाशिक विभागाच्या विजयी खेळाडूंना शुभेच्छा देताना आदिवासी विकास विभाग नाशिकचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी ही कामगिरी विभागाच्या क्रीडाविषयक दूरदृष्टी आणि एकत्रित प्रयत्नांचे फळ असल्याचे म्हटले. उप आयुक्त . सुदर्शन नगरे यांनी खेळाडूंच्या चिकाटी, समर्पण आणि जिद्दीचे भरभरून कौतुक केले. तसेच, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी विभागातील प्रत्येक मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे हे यश शक्य झाले असल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी खेळाडूंना जोमाने लढण्याचे आवाहन केले.

या यशामध्ये प्रकल्पातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक यांच्या योगदानाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी अशा मोठ्या व्यासपीठावर उत्कृष्ट कामगिरी करू शकले. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खेळाडूंच्या तयारीसाठी दिलेले सहकार्य आणि नियोजनही यशाचा महत्वाचा भाग ठरला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलच्या वतीने सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील यांनी संपूर्ण जबाबदारी प्रभावीपणे सांभाळत, खेळाडूंच्या विजयाची पायाभरणी केली. यशाचा हा प्रवास भविष्यातही नवनवीन शिखरे गाठेल, यासाठी सर्वांनी पुन्हा एकत्रित प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

Protected Content