अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खोकरपाट शिवारातील शेताजवळ चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षापलटी होऊन एकाचा दाबून मृत्यू झाला तर ९ प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पॅजो रिक्षावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती कैलास जाधव रा. अमळनेर मयताचे नाव आहे.
राहुल सुखदेव अहिरे वय-२७ रा. पिळोदा ता. अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल अहिरे हे त्यांचे नातेवाईकांसह पारोळा येथे लग्नकार्यासाठी गेलेले होते. शनिवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लग्न आटवून राहुल अहिरे यांच्यासह त्यांचे परिवारातील सदस्य हे रिक्षा क्रमांक (एमएच १९ एएक्स ९२१८) मध्ये बसून अमळनेर येथे येत होते. त्यावेळी रिक्षामध्ये मयत निवृत्ती कैलास जाधव हे देखील प्रवास करत होते. दरम्यान पॅजो रिक्षाचालकाला मोबाईलवर फोन आला, त्यावेळी त्याने फोन उचलला तेवढ्यात त्याचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा पलटी झाली. ही घटना अमळनेर तालुक्यातील खोकरपाट शिवाराजवळ घडली आहे. दरम्यान या अपघातामध्ये निवृत्ती जाधव यांचा दाबून मृत्यू झाला तसेच रिक्षात बसलेले राहुल सुखदेव अहिरे व त्यांचे नातेवाईक निर्मलाबाई अहिरे, पुनम अहिरे, भूपेंद्र अहिरे, सोनाली अहिरे, योगेश अहिरे, पियुष वरुडे, सखुबाई न्हावी, उषाबाई नाथ बुवा हे जखमी झाले. जखमींना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्या अपघात प्रकरणी राहुल अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पॅजो रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहे.