मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद पदावर वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांची निवड करण्यात आली आहे. सध्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असून सभागृहात विश्वास दर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. तसेच सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश बोरनारे यांनी व्हीपद्वारे दिला आहे.



रमेश बोरनारे हे 2019 पासून वैजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आहेत. रमेश बोरनारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. २०२२ साली झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद केले होते. यंदा आता रमेश बोरनारे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच भरत गोगावले यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्य प्रतोद पदावर निवड झालयावर तातडीने बोरनारे यांनी शिवसेनेच्या सर्व ५७ आमदारांसाठी व्हीप जारी केले आहे.


